पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…
पुणे बातमी

पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…

पुणे : ”कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. कोरोनाच्या लसीच वितरण पहिल्यांदा भारतातच होणार आहे. तसेच, सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लसीची किंमत असणार आहे. अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्ड लसीचा आढावा घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना लशीच्या तयारीबाबत माहिती देताना पूनावाला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीबाबत संपूर्ण माहिती घेतली. लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार आहोत. आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींना सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली. मोदींनी यावेळी कोरोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. तत्पूर्वी मोदींनी अहमदाबाद आणि हैदराबादमधील व्हॅक्सिन प्लांटचा दौरा केला. हैदराबादमध्ये, मोदींनी चाचणीच्या यशस्वीतेसाठी ‘कोवाक्सिन’ ही देशी लस तयार करणार्‍या कंपनी भारत बायोटेकच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.. मोदी म्हणाले- लसीचे काम वेगवान करण्यासाठी त्यांची टीम आयसीएमआर बरोबर काम करत आहे.