लसीकरण सुरळीत करण्यासाठी सिरमचा मोठा निर्णय; पूनावालांची घोषणा
देश बातमी

लसीकरण सुरळीत करण्यासाठी सिरमचा मोठा निर्णय; पूनावालांची घोषणा

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात व्यापक लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असली, तरी अजून दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची ५० टक्के मालकी अर्थात ५० टक्के शेअर्स सिरम इन्स्टिट्युटनं खरेदी केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातली माहिती दिली असून दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेलं पत्रकच अदर पूनावाला यांनी आपल्या ट्वीटसोबत शेअर केलं आहे. देशातील लस उत्पादक उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं फार आवश्यक आहे. हेच साध्य करण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं शॉट कायशामधील ५० टक्के समभाग खरेदी केले आहेत. भारतीय लस उद्योग विश्वासाठी औषध पॅकेजिंग उत्पादनांचा अखंड पुरवठा होणं यामुळे शक्य होणार आहे, असं अदर पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शॉट कायशा ही फार्मा पॅकेजिंग क्षेत्रातली भारतामधील महत्त्वाची कंपनी आहे. Schott AG ही जर्मनीमधील काच उत्पादक कंपनी आणि कायशा ही भारतातील कंपनी यांच्या भागीदारीतून शॉट कायशा या कंपनीची निर्मिती झाली आहे. देशभरात सर्वाधिक २.५ बिलियन व्हायल्स प्रतिवर्षी ही कंपनी उत्पादित करते. या वर्षभरात तब्बल ३८० मिलियन व्हायल्सची विक्री करण्याचं लक्ष्य कंपनीने ठेवल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी हा आकडा ११३ मिलियन वायल्स इतका होता.