राज्यात पावसाची हजेरी; सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
बातमी महाराष्ट्र

राज्यात पावसाची हजेरी; सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. राज्यात बुधवारी (ता. १८) बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बुधवारी राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशाला दिला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नगर, मराठवाड्यातील जालना, बीड, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला असून यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील पुण्यात तीन मिलिमीटर, जळगाव दोन मिमी, महाबळेश्वर पाच मिमी, नाशिक तीन मिमी, तर सांगलीत दोन मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

कोकण विभागातील मुंबईत नऊ मिमी, मराठवाड्यातील औरंगाबादेत दोन, तर परभणीत १९ मिमी पाऊस पडला आहे. विदर्भात अकोल्यात ११ मिमी, चंद्रपूरमध्ये सात मिमी, गोंदियात चार मिमी, नागपुरात १६ मिमी, तर वर्ध्यात दहा मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.