सामान्य नागरिकांना आणखी एक झटका; दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ
देश बातमी

सामान्य नागरिकांना आणखी एक झटका; दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट असताना आता सामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर त्याचे परिणाम आता इतर वस्तूंवर दिसू लागले आहे. आता उद्यापासून म्हणजेच १ जुलैपासून अमूल दूध २ रुपये प्रति लिटर महाग होणार आहे. संपूर्ण देशात नव्या किंमतीनुसार दूध उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर, अमूलच्या सर्व प्रोडक्टवर दोन रुपयांची वाढ होणार आहे. यात अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रीम या प्रोडक्टचा समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दीड वर्षानंतर अमूलने आपले दर वाढवले आहेत. नवे दर लागू झाल्यानंतर अमूल गोल्ड ५८ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसहित अन्य राज्यांना दूध महाग मिळणार आहे. नव्या किंमती अमूल गोल्ड, ताजा, शक्ती, टी स्पेशलसह गाय आणि म्हशीच्या दुधावरही लागू होणार आहेत. जनावरांचं खाद्य महागलं आहे. त्याचबरोबर पॅकेजिंगची किंमतीही ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच परिवहन, वीज यांच्या किंमतीही ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

दुधाच्या किंमती वाढल्याने आता दुसऱ्या डेअरी प्रोडक्टच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. पनीर, तूप, ताक, लस्सी, आइसक्रिम यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.