कोविड सेंटरमध्ये आग; ५२ रुग्णांचा होरपळून मृत्यू, तर ६७ जखमी
बातमी विदेश

कोविड सेंटरमध्ये आग; ५२ रुग्णांचा होरपळून मृत्यू, तर ६७ जखमी

इराक : इराकमधील नसीरिया दक्षिणेकडील शहरातील एका रुग्णालयात कोविड वार्डमध्ये ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला. त्यानंतर आग भडकली. यात दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह ५२ रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. तर या दुर्घटनेत जवळपास ६० जण जखमी झाले आहेत. कोरोनाच्या उद्रेकानंतर नसीरियात अल हुसैन कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीच्या कारणाचा शोध घेण्यात आला. त्यावेळी ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊनच आग लागल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. आग लागल्यानंतर रुग्णालयात धावपळ उडाली. स्फोटामुळे आग लागलेली असताना क्षणाधार्थ आगीच्या लोळांनी कोविड वार्डाला वेढा दिला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना जळणारे मृतदेह बाहेर काढावे लागले. तर आगीमुळे सगळीकडे धूर पसरल्यानं अनेक कोविड रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास सुरू झाला. दरम्यान या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेची पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी गंभीर दखल घेतली. पंतप्रधानांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. अल हुसैन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे आदेश पंतप्रधान कदीमी यांनी या बैठकीत दिले. यापूर्वीही एप्रिलमध्ये बगदादमधील एका रुग्णालयात आग लागली होती. या घटनेत ८२ रुग्ण होरपळून मरण पावले होते. तर ११० जण जखमी झाले होते. इराकमधील आरोग्य विभाग मोठ्या कठीण काळातून जात असतानाच आगीची ही दुसरी मोठी घटना घडली आहे.