खडसेंच्या जावयाची ईडीकडून चौकशी सुरुच; कोठडीत वाढ
पुणे बातमी

खडसेंच्या जावयाची ईडीकडून चौकशी सुरुच; कोठडीत वाढ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडीकडून चौकशी सुरुच असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना अटक केली होती. आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरु आहे आणि चौधरी यांची आणखी चौकशी करणं गरजेचं आहे, असं ईडीने न्यायालयाला सांगितलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ईडीच्या आरोपानुसार २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीच्या आधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. या घडामोडीचा आधार घेत ईडीने समांतर तपास सुरू केल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवला होता.

या व्यवहारासाठी खडसे यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर केला, असा आरोप त्यांच्यावर आहे. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना खरेदी व्यवहाराच्या नोंदीनुसार गिरीश यांनी तो ३.७५ कोटी रुपयांना विकत घेतल्याची नोंद आढळते. हा भूखंड इतक्या कमी किमतीस कसा विकत घेतला आणि तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या रकमेचा स्रोत काय, या मुद्दय़ांवर ईडीने तपास सुरू केला. गिरीश यांनी चौकशीदरम्यान काही कंपन्यांकडून कर्ज घेतले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ही रक्कम बोगस कंपन्यांद्वारे वळविण्यात आल्याची माहिती तपासातून हाती आल्याचे ईडीने सांगितले आहे.