गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा; मुख्याध्यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार
पश्चिम महाराष्ट्र बातमी

गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा; मुख्याध्यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार

मुख्याध्यापकाने दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधून समोर आली आहे. या प्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी नराधम मुख्यध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. दिलीप रामचंद्र ढेबे (वय ५०, रा मेटगुताड ता. महाबळेश्वर) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जगभरात महिला दिन साजरा होत असतानाच महाबळेश्वरमध्ये ही घटना घडल्याने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे. दिलीप रामचंद्र ढेबे एका हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आहे. याच शाळेत दहावी इयत्तेत शिकणाऱ्या जवळच्या नात्यातील १५ वर्षीय मुलीवर शाळेच्या प्रयोग शाळेत व हॉलमध्ये वारंवार जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवत अत्याचार केला.

याबाबत माहिती मिळताच एका नागरिकाने चाईल्ड हेल्पलाईन १०९८ क्रमांकावर तक्रार दाखल केली. महाराष्ट् पोलिसांच्या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशीसाठी तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. मागील पाच दिवसांपासून महाबळेश्वर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.

त्यानंतर आरोपी व पिडीत विद्यार्थिनीचा पत्ता महाबळेश्वर पोलिसांनी शोधून काढत मुलीला विश्वासात घेतले. यानंतर मुलीने आपल्यावर होत असलेल्या आत्याचाराचा पाढा वाचला. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून महाबळेश्वर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. याबाबत मुख्याध्यापकाने पोलिसांजवळ आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

यानंतर महाबळेश्वर पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महाबळेश्वर पोलीस निरिक्षक बी ए कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या बलात्कार प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान महाबळेश्वरसारख्या कौटुंबिक पर्यटनस्थळी असा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.