मनसुख हिरेन मृत्यू यांची हत्या सचिन वझेंनी केली असावी; सभागृहात देवेंद्र फडणवीस आक्रमक
राजकारण

मनसुख हिरेन मृत्यू यांची हत्या सचिन वझेंनी केली असावी; सभागृहात देवेंद्र फडणवीस आक्रमक

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू यांची हत्या एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांनी केली असावी, असा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिरेन यांच्या पत्नीने केली आहे. अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सचिन वझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेली तक्रार वाचून दाखवली. “२६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी माझे पती चौकशीसाठी सचिन वझे यांच्यासोबत गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर १०.३० वाजता आले. दिवसभर सचिन वझेंसोबत होतो असं मला त्यांनी सांगितलं. २७ फेब्रुवारीला सकाळी माझे पती पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि रात्री १०.३० वाजता आले. त्यानंतर २८ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सचिन वझेंसोबत गेले आणि जबाब नोंदवला. जबाबाची प्रत घऱी आणून ठेवण्यात आली. त्यावर सचिन वझे यांची स्वाक्षरीदेखील आहे,” असं तक्रारीत नमूद असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. पुढे ते म्हणाले की, “याचाच अर्थ दुसऱ्या कोणीही त्यांची चौकशी केलेली नाही. तिन्ही दिवस ते सचिन वझेंसोबत होते,.

वरील एकंदरीत परिस्थितीवरून माझे पती मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा आणि खून सचिन वझेंनी केला असावा, अशी मला शंका आहे, अशी गंभीर शंका हिरेन यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीतून केली आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. दुसरी बाब म्हणजे मनसुख हिरेन यांची कार गेल्या काही महिन्यांपासून सचिन वझेंकडे होती. त्यांनी फेब्रुवारीत ती परत केली होती. दरम्यान, एवढे पुरावे असताना सचिन वझेंना अटक का करण्यात आली नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

“२०१७ च्या एका खंडणी प्रकरणात दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. एकाचं नाव धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसऱ्याचं नाव सचिन वझे आहे. मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे याच्याकडे आहे. ४० किमी दूर मृतदेह सापडतो…गावडेकडे जाण्याचं कारण काय आहे. याच्यापेक्षा अधिक काय पुरावे हवेत? २०१ अंतर्गत सचिन वझेंना तात्काळ अटक का नाही? ३०२ तर सोडून द्या…हा राजकारणचा विषय नाही पण थेट पुरावे असतानाही २०१ अंतर्गत अटक होत नसेल तर कोण आणि कशासाठी वाचवत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक झाल्यानंतर दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले.