मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार : अनिल देशमुख
बातमी महाराष्ट्र

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होणार : अनिल देशमुख

काँग्रेसचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. सभागृहात मनसुख हिरेन आणि सचिन वझे प्रकरणी विरोधी पक्षाने आज आक्रमक भूमिका मांडली. त्याचबरोबर मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुखांनी राज्यसरकारची भूमिका स्पष्ट केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“खासदार मोहन डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे प्रफुल्ल खेडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळी जवळचे सहकारी होते” , असा दावा अनिल देशमुख यांनी विधानसभेत केला. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ उडाला. विधानसभेत बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, “दादर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे सात वेळा खासदार होते. सात वेळा खासदार राहिलेला व्यक्ती आत्महत्या करतो. तेही मुंबईत येऊन. त्यांनी सुसाईड नोटमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांनी दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केल्या जात होत. सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या पटेल यांच्या माध्यमातून दिल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे,” अशी माहिती दिली.

डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये असं म्हटलं आहे की, मी मुंबईत येऊन आत्महत्या करतोय, त्रास मला तिकडे असला तरी इथे आत्महत्या करतोय. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रातच मिळेल. त्यांच्या पत्नीने कलाबेन मोहन डेलकर यांनी सुद्धा मला पत्र दिलेलं आहे. अभिनव मोहन डेलकर यांनीही पत्र दिलेलं आहे. यापूर्वी सांगितलेले आरोपच केलेले आहेत,” असं देशमुख म्हणाले. त्यामुळे मोहन डेलकर यांच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, डेलकर यांच्या मुलाने आणि पत्नीने पत्र देखील लिहिले असून त्यात त्यांनी प्रफुल्ल खेडा पटेलावर आरोप लावले आहेत. माझे वडिल हे प्रचंड दबावाखाली होते असे म्हटले आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती, या आत्महत्येनंतर पोलिसांना त्यांच्या खोलीत सुसाईड नोट सापडली, जवळपास १४-१५ पानांचे हे पत्र होतं, त्यात अनेक बड्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं असल्याचं सांगण्यात येत होतं.