जीक्यू मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तीत पहिल्यांदाच दलित युवकाला स्थान
देश बातमी

जीक्यू मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तीत पहिल्यांदाच दलित युवकाला स्थान

पुणे : जीक्यू इंडियाने नुकतीच देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २५ प्रभावशाली युवा भारतियांची यादी जाहीर केली आहे. जेन्टलमन क्वार्टरलीच्या प्रभावशाली २५ भारतीय व्यक्तींच्या यादीत पहिल्यांदाच एका अमेरिकास्थित आंबेडकरवादी विचाराच्या दलित युवकाला स्थान मिळाले आहे. डॉ. सुरज मिलींद येंगडे असे या युवकाचे नाव आहे. या यादीत एकमेव स्कॉलर म्हणून सुरज यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. या यादीत भारतीय क्रिकेटर के एल राहुल, ऋषभ पंत, अभिनेत्री अनुष्का शर्मा, दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून, अभिनेता कर्नेश शर्मा, रेसर जेहान दारुवाला, रिअलमीचे सीईओ माधव सेठ, फिल्ममेकर चैतन्य ताम्हाणे आदींचा समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

माझी समजाप्रती असलेली भावना आणि समाजावर असलेले प्रेम यामुळे हे सर्व होऊ शकले आहे. समाजाकडून मिळालेल्या आदर सन्मान आणि प्रेमामुळे मोठी ताकद मिळते, असे सुरजने म्हटले आहे. तसेच, मी ज्या जातीतून किंवा भागातून येतो त्यामध्ये बदल असता तर कदाचित हा पुरस्कार मला खूप आधी मिळाला असता अशी खंतही सूरजने बोलून दाखविली. हा पुरस्कार माझ्यापेक्षा जास्त दलित समाजातील तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. ही एक नवी सुरुवात आहे. दलित समाजातील तरुण-तरुणींनी आपआपल्या क्षेत्रात अशाच पद्धतीने मन लावून काम करायला हवे. नववीन क्षेत्रात पाऊल टाकायला हवे. वेळ लागेल पण आपल्या चांगल्या कामाचे फळ आपल्याला नक्की मिळेल. त्याचबरोबर, आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत, असे सूरजने म्हटले आहे.

दरम्यान, आफ्रिकन हेअरस्टाईल मध्ये असलेला नांदेडच्या आंबेडकर नगरचा सूरज येंगडे अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करत आहे. सूरजचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झाले. त्यानंतर काही दिवस मुंबईमध्ये शिक्षण घेऊन तो शिष्यवृत्ती मिळवून युरोप, आफ्रिका या खंडात शिक्षण घेऊन सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. जात, वर्णभेद, वंश हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे.

आफ्रिकन विद्यापीठातून पीएचडी मिळवणारा तो पहिला दलित स्कॉलर आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून त्यानं पीएचडी मिळवली आहे. ‘द रॅडिकल इन आंबेडकर’ हे पुस्तक सूरजने आनंद तेलतुंबडे यांच्यासोबत संपादित केलं आहे. दलित, ब्लॅक, रोमा, इराकु आणि जगभरातील स्थलांतरित यांना एकत्रित आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तसेच, भारतातील जातवास्तव, स्वत:ला मिळालेले जातीचे चटके, दलितांची सध्यस्थिती, जातीअंताच्या चळवळीसमोरची आव्हानं याचा उहापोह सूरजनं त्याच्या ‘कास्ट मॅटर्स’ या पुस्तकातून केला आहे.