मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद
बातमी महाराष्ट्र

मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद

मुंबई, दि. २० : सुप्रशासनाच्या सुसूत्रीकरण व अंमलबजावणीबाबतच्या अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचे दि. २३ व २४ जानेवारी, २०२३ या कालावधीत रॉयल हॉल, नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया, वरळी, मुंबई येथे आयोजन करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेच्या आयोजनाबाबत मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज, साप्रविचे सह सचिव सोमनाथ बागुल, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती/प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके यांची उपस्थिती होती.

श्रीमती सौनिक म्हणाल्या की, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेचे उद्घाटन दि.२३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दि.२४ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे या परिषदेला संबोधित करणार आहेत.

केंद्र सरकार व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. देशातून ३० राज्यांमधील अधिकारी सहभागी होणार आहेत. या परिषदेत प्रशासकीय सुधारणा, ई-गव्हर्नन्स,गुड गव्हर्नन्स इत्यादी विषयांवर चर्चा विनिमय होणार आहे. देशातील त्या त्या विषयातील तज्ञ वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले असल्याचे श्रीमती सौनिक यांनी सांगितले.

या परिषदेत स्टार्टअप आणि गुड गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स पुरस्कार प्राप्त उपक्रम, महाराष्ट्र राज्य सरकारचे सर्वोत्तम पध्दती, डिजिटल संस्था आणि डिजिटल सचिवालय,ई गव्हर्नन्स मधील स्टार्टअप, ई सेवा राज्यामध्ये वितरण अशा विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रीमती सौनिक यांनी यावेळी सांगितले.