बुलेट थाळी’ खा आणि बुलेट बाईक जिंका; पुण्यातील हॉटेल मालकाची भन्नाट ऑफर
पुणे बातमी

बुलेट थाळी’ खा आणि बुलेट बाईक जिंका; पुण्यातील हॉटेल मालकाची भन्नाट ऑफर

पुणे : अनलॉकनंतर रेस्तराँ पुन्हा सुरू झालेत, पण ग्राहकांचा अद्यापही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने पुण्याच्या एका रेस्तराँ मालकाने भन्नाट शक्कल लढवलीये. हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुण्यातील एका रेस्टॉरंटने चक्क बुलेटची ऑफर दिली आहे. विराट ‘बुलेट थाळी’ एका तासात संपवा आणि बुलेट बाईक जिंका अशी ऑफर वडगाव मावळमधील शिवराज हॉटेलने दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या हॉटेलमध्ये मिळणारी अतिभव्य ‘बुलेट थाळी’ तुम्ही 60 मिनिटांत संपवू शकलात, तर घरी जाताना तुम्ही बुलेटवर बसून जाल. कारण 1 लाख 65 हजार रुपयांची बुलेट तुम्हाला बक्षीस स्वरुपात मिळणार आहे. एका थाळीची किंमत 4444 रुपये आहे. कोरोना काळात धंदा होत नसल्याने वडगाव-मावळमधील शिवराज रेस्तराँचे मालक अतूल वायकर हे देखील त्रस्त होते. ग्राहक फिरकत नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार आणि रोजचा खर्चही निघत नव्हता , अशात वायकर यांच्या डोक्यात एक ‘बुलेट आयडिया’ आली.

काय काय मिळणार बुलेट थाळीमध्ये ?
शिवराजमध्ये मिळणाऱ्या बुलेट थाळीत दोन-चार नव्हे, तर तब्बल बारा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिश आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी चार किलो मटण आणि तळलेले मासे वापरले जातात. विशेष म्हणजे द बुलेट थाळी एक नॉन-व्हेज थाळी आहे. यामध्ये 4 किलो मटण आणि फ्राय मच्छीचे जवळपास १२ पदार्थ असतात. 55 कर्मचारी ही थाळी बनवण्यासाठी काम करतात. यामध्ये फ्राय सुरमई, पापलेट, चिकन तंदूरी, ड्राय मटण, ग्रे मटण, चिकन मसाला आणि कोळंबी व बिर्याणी यांसारखे पदार्थ असतात.

थाळी खाण्यासाठी अट
स्पेशल बुलेट थाळी खाण्यासाठी काही अटी त्यांनी ठेवल्यात. मुख्य म्हणजे एकाच व्यक्तीला ही थाळी खावी लागेल. तसेच पूर्ण थाळी संपवण्यासाठी त्याला एक तासाचा वेळ मिळेल.
यापूर्वी आठ किलोची रावण थाळी चौघांनी 60 मिनिटात संपवण्याचं आव्हान शिवराज हॉटेलमध्ये होतं. विजेत्याला पाच हजार रुपयांचं रोख पारितोषिक मिळणार होतंच, शिवाय विजेत्यांना थाळीसाठी एक रुपयाही मोजावा लागणार नव्हता.