राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी मुंबई

राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्लांट सुरू करू शकतो, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसूलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या कोळसा आणि खनिकर्म गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय परिषदेत सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ताज हॉटेलमध्ये वाणिज्यिक कोळसा खाणींचा लिलाव व खाण क्षेत्रातील संधी या विषयावरील गुंतवणूकदारांची परिषद झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, वीज निर्मितीत कोळशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राज्यात वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेऊन त्यांना सतत वीजपुरवठ्यासाठी कोळशाची उपलब्धता शाश्वत असावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्र अतिशय समृद्ध असून राज्याच्या सकल उत्पन्नात मोलाची भर घालण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती दडलेली असून तिचा खाण उद्योगात वापर होणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच गरजेनुसार या खाणींचा वाणिज्यिक वापर व्हायला हवा या केंद्र सरकारच्या धोरणाला सहकार्य करून राज्यातील खनिकर्मात वाढ व्हावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोळसा खाणींच्या विकासासाठी केंद्र सरकार ज्या बाबींची पूर्तता करण्यास सुचवेल त्या बाबी पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे सुरू करण्यात आलेल्या लोहखनिज खाणीमुळे स्थानिकांचे जीवनमान बदलले आहे. या प्रकल्पाला मोठा लोहखनिज प्रकल्प म्हणून नावारूपाला आणण्याची संधी दडलेली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

देशाच्या आर्थिक राजधानीत कोळसा खाण व्यावसायिकांसाठी राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केल्याबद्दल राज्याचे खनीकर्म मंत्री श्री. भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले. राज्यात ॲल्युमिनिअम प्रकल्पांसाठी कोळसा उलपब्ध करून दिल्यास रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. खनिकर्म व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्णपणे पाठबळ मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी केंद्रीय सचिव श्री. भारद्वाज, मीना आणि नागराजू यांनी मनोगत व्यक्त केले.