अजित दादांनी गॉगल घातलं तरी मी दादांच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार; उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

अजित दादांनी गॉगल घातलं तरी मी दादांच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार; उद्धव ठाकरे

जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, यावेळी आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात अजित दादांचं कौतुक करताना म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांना सात भाषा यायच्या. त्यापैकी एक भाषा म्हणजे डोळ्याने ते मावळ्यांना सांगायचे. त्यांची सांकेतिक खूण मावळ्यांना योग्य सूचित करायचे. आत्ता अशी भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार वापरतात. बेनकेंनी असं म्हणताच अजित दादांनी हात जोडले.

तर बेनकेंच्या याच विधानाच्या आधारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी चांगलीच फिरकी घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की, आमदार अतुल बेनके म्हणाले दादांना डोळ्याने ओळखणारी भाषा येते. आता मला ती भाषा शिकावी लागणार आहे. का? तर मला दादाच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अगदी गॉगल घातलं तरी मी दादाच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि एकच हशा पिकला.

तर यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिवजयंती जोमाने साजरी करावी यात दुमत नाही. पण सध्या कोरोना पुन्हा कहर माजवू लागलाय. मंत्र्यांना ही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे शिवजयंती सारखे उत्सव नाईलाजाने थोडक्यात घ्यावे लागतायेत. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी देखील मावळ्यांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय कदापि घेतला नसता, असं अजित पवार म्हणाले. शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी होते, ते शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घ्यायचे, असंही अजित पवार म्हणाले.