कोरोना महामारीच्या युद्धात मास्क हीच आपली ढाल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

कोरोना महामारीच्या युद्धात मास्क हीच आपली ढाल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार आज, 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कोरोनाच्या पुन्हा वाढत्या संसर्गावर देखील भाष्य करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ”माझं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळं लाभलेलं आहे. आता कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे. वातावरण छान आहे, पण तोंडावर मास्क आहे. महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपलं युद्ध सुरू आहे. यासाठी आपली ढाल म्हणजे मास्क आहे. नुसती तलवार हातात घेतली म्हणजे युद्ध जिंकता येत नाही. असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, काही साप आहेत. ते वळवळ करतायेत, त्यांना ठेचायचं असतं आणि आपण पुढे जायचं असतं, असं ते म्हणाले. आमदार अतुल बेनके म्हणाले की, अजितदादांना डोळ्याने ओळखणारी भाषा येते. आता मला ती भाषा शिकावी लागणार आहे. का? तर मला दादाच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. अगदी गॉगल घातलं तरी मी दादाच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हणताच एकच हशा पिकला.

दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, महाराष्ट्राचा इतिहास जगभरात पोहचवायचा असेल तर मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना रायगडशी जोडलं गेलं पाहिजे. हे सी फोर्ट सर्किट टूरिझम म्हणजे जलदुर्गाच्या माध्यमातून जोडायला हवं. मुंबईतून समुद्रामार्गे रायगडला निघताना खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, मुरुड जंजीरा हे किल्ले येतात. तिथून काही किलोमीटरवर रायगड किल्ला येतो. त्यामुळे हे किल्ले एकमेकांना समुद्रामार्गे जोडले तर पर्यटक वाढतील, शिवरायांचा इतिहास जगभर पोहचेल.