सुएझ कालव्यातील जहाज पाच दिवसानंतर बाहेर काढण्यात यश
बातमी विदेश

सुएझ कालव्यातील जहाज पाच दिवसानंतर बाहेर काढण्यात यश

सुएझ : इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकून पडलेलं मालवाहू जहाज बाहेर काढण्यात पाच दिवसांनंतर यश आलं आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पनामाचा ध्वज असलेले एव्हर गिव्हन नावाचं मालवाहू जहाज आशिया व युरोप दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. मंगळवारी एका निमुळत्या भागात ते आफ्रिका व सिनाई द्वीपकल्पात ते जहाज अडकून पडलं, त्यामुळे मोठी सागरी वाहतूक कोंडी झाली होती. हे अवाढव्य जहाज कालव्याच्या सहा किलोमीटर उत्तरेला दक्षिण प्रवेशद्वाराकडे ते सुएझ शहरानजीक अडकून पडलं होतं. मंगळवारपासून या जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पाच दिवसांनंतर या प्रयत्नांना यश आलं. केप शिपिंग सर्व्हिसेसच्या हवाल्याने या जहाजाला बाहेर काढण्यात आल्याचं वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे.

सुएझ कालवा प्राधिकरणाने शनिवारी जहाज बाजूला करण्यासाठी दोनदा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं होतं. जास्त भरतीच्या लाटांचा फायदा घेऊन शनिवारी प्रयत्न केले गेले. जपानच्या शोई कायसन केके कंपनीने १० बोटी हे जहाज बाजूला काढण्यासाठी पाठवल्या होत्या. शोई कायसेन कंपनीचे अध्यक्ष युकिटो हिगाकी यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. हे जहाज पुन्हा तरंगू शकणार नसेल तर त्याचे कंटेनर्स वेगळे करावे लागणार आहेत, पण ते खूप अवघड आहे, असंही हिगाकी यांनी स्पष्ट केलं आहे. आता हे जहाज बाहेर काढल्यानंतर त्याच्या सुरक्षेची चाचपणी करुन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.