जॅक मा यांचा ठावठिकाणा सापडला; चीनी वृत्तपत्राने केला खुलासा
बातमी विदेश

जॅक मा यांचा ठावठिकाणा सापडला; चीनी वृत्तपत्राने केला खुलासा

पेइचिंग : जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांची ओळख आहे. मात्र जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याच्या चर्चा होत्या. जागतिक पातळीवर जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’ने जॅक मा यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चीनच्या एका सरकारी वृत्तपत्राने खुलासा करत जॅक मा यांचा ठावठिकाणा उघड केला आहे. या वृत्तपत्रानुसार, जॅक मा यांना एका अज्ञातस्थळी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच चिनी सरकारकडून जॅक मा यांना देश सोडून न जाण्याची ताकीद दिली आहे, अशी माहिती एका अहवालातून देण्यात आली आहे. जॅक मा यांच्या बेपत्ता होण्यामागे चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेला वाद कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, जॅक मा यांनी ऑक्टोबरमध्ये चीनच्या वित्तीय नियामकावर टीका केली होती. जॅक मा यांनी नियामकाच्या नियमांना ‘म्हाताऱ्यांचा क्लब’ आणि चिनी बँकांना ‘सावकारी दुकाने’ म्हटले होते. या टीकेमुळे चिडलेल्या सरकारने जॅक मा यांच्या अँट समूहाचा एक आयपीओ रोखला. अलिबाबाविरुद्ध डिसेंबर २०२० मध्ये एकाधिकारशाहीविरोधी चौकशी सुरू करण्यात आली.

वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, नोव्हेंबर महिन्यात चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे 37 अब्ज डॉलर्सचे आयपीओ निलिंबित केले. जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचे आदेश थेट चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर ख्रिसमसच्या आदल्या दिवशी जॅक मा यांच्यावर देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली. जोपर्यंत अलिबाबा समूहावर करण्यात आलेली कारवाई सुरु आहे, तोपर्यंत जॅक मा देशाबाहेर जाऊ शकत नाहीत, असं चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना सांगितलं होतं.

चिनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे चिनमधील सत्ताधाऱ्यांनी जॅक मा यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. परंतु, चिनमध्ये हे पहिल्यांदाच घडत नसून याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. याआधीही सरकार विरोधात बोलणाऱ्या अनेकांना चिनमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. याआधी शी जिनपिंग सरकारवर टीका करणारे प्रॉपर्टी बिजनसमन रेन झिकियांग अचानक बेपत्ता झाले होते. त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शी जिनपिंग यांना सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना 18 वर्षांसाठी कारागृहात पाठवण्यात आलं होतं. चीनचे अरबपती शिआन जिआनहुआ वर्ष 2017 पासून नजरकैदेत आहेत.