पाकिस्तानविरुद्ध द्विशतक ठोकत विल्यमसनची नव्या विक्रमाला गवसणी
क्रीडा

पाकिस्तानविरुद्ध द्विशतक ठोकत विल्यमसनची नव्या विक्रमाला गवसणी

नवी दिल्ली : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पाकिस्तानविरुद्ध द्विशतक ठोकत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मंगळवारी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात केन विल्यमसनने हेन्री निकल्स याच्यासोबत ३६९ धावांची भक्कम भागीदारी उभारली. याचसोबत विल्यमसनने कसोटी क्रिकेटमधील ७ हजार धावांचा टप्पा गाठला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केन विल्यमसन हा कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वात कमी डावांमध्ये ७ हजार धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज ठरला. केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन शतकं ठोकत ७ हजार धावांचा टप्पा गाठला. असा पराक्रम करणारा विल्यमसन न्यूझीलंडचा केवळ तिसरा फलंदाज ठरला. याआधी स्टीफन फ्लेमिंग (७१७२) आणि रॉस टेलर (७३७९*) या दोघांनी सात हजार धावांचा टप्पा गाठला होता. पण विल्यमसनने सर्वात कमी डावांत हा पराक्रम केला.

विल्यमसनने ८३ कसोटी सामन्यात ७ हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने ५३.८५ च्या सरासरीने धावा काढत हा पराक्रम आपल्या नावे केला. त्याच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत त्याने २४ शतकं आणि ३२ अर्धशतकं ठोकली आहेत. २५१ धावा ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्याला हा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र या डावात तो २३८ धावांवर बाद झाला. ३६२ चेंडूत २८ चौकारांसह त्याने ही खेळी केली. त्याने निकल्ससोबत केलेली ३६९ धावांची भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. हेन्री निकल्स (१५७) आणि डेरल मिचेल (१०२*) यांच्या दमदार शतकाच्या साथीने न्यूझीलंडच्या संघाने ६ बाद ६५९ धावांपर्यंत मजल मारली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली. स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांची अव्वलस्थानासाठी चालू असलेली स्पर्धा संपुष्टात आणून तो पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला होता.