राज्य सरकारची मोठी घोषणा ! उद्यापासून मिळणार मोफत रक्त
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारची मोठी घोषणा ! उद्यापासून मिळणार मोफत रक्त

मुंबई : शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी एक महत्वाची बातमी असून १२ डिसेंबरपासून म्हणजेच उद्यापासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टोपे म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्यास मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह खासदार सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरूण थोरात आदींची यावेळी उपस्थिती होती.

रक्त तयार करता येत नाही आणि संकलन केलेले रक्त दीर्घकाळ साठवता येत नाही. त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ते २० डिसेंबर दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले. नागरिकांनी आपल्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी अशा विविध प्रसंगाचे औचित्य साधून वर्षातून दोन वेळेस रक्तदान करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.