लसीचा दुष्काळ संपणार! मोदी सरकारने दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर
देश बातमी

लसीचा दुष्काळ संपणार! मोदी सरकारने दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर

नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने चांगला वेग घेतला आहे. आत्तापर्यंत जवळपास ४० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आता मोदी सरकारने आणखी लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ठरणार आहे. लवकरच देशाला लसींचे ६६ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे तब्बल १४ हजार ५०५ कोटी किमतीचे डोस भारत सरकारने मागवले आहेत. ज्यामुळे देशातल्या लस उपलब्धतेत निश्चितच वाढ होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२६ जून रोजी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशात १३५कोटी डोस उपलब्ध करुन देण्याचं केंद्राचं लक्ष्य आहे. ते समोर ठेवूनच ही ऑर्डर देण्यात आली आहे. या ६६ कोटी डोस व्यतिरिक्त सरकारने कोर्बेवॅक्स या लसीचे ३० कोटी डोस आगाऊ रक्कम देऊन राखीव ठेवल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. याचाच अर्थ ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशात एकूण ९६ कोटी डोस उपलब्ध होणं अपेक्षित आहे. हे ९६ कोटी डोस केंद्राच्या ७५ टक्क्यांच्या वाट्यामधले असतील. या व्यतिरिक्त खासगी क्षेत्रामध्ये या कालावधीत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे २२ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत.

ह्या डोसमुळे वर्षाअखेरीपर्यंत देशातल्या १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण होण्यास मदत होणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीतलं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांचं एकूण उत्पादन ८८ कोटी इतकं ठरवण्यात आलं आहे. जुलैमध्ये ३.५ कोटींची घट झाली असली तरी या कालावधीमध्ये कोवॅक्सिनच्या ३८ कोटी डोसचं उत्पादन घेण्यात आलं आहे.