बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते; शिवसेना नेत्याचा दावा
बातमी मुंबई

बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते; शिवसेना नेत्याचा दावा

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पुकारलेलं बंड यशस्वी झाले नसते तर एकनाथ शिंदे हे स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते, असे धक्कादायक वक्तव्य राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ठाकरे गटाकडून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला जात आहे. काल म्हणजे २० जूनला ठाकरे गटाकडून जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन करताना एक रंजक किस्सा सांगितला. ते मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बंड केले. तुम्ही कोणाला गद्दार म्हणताय? माझे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. ज्या ज्या वेळी उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे, त्या प्रत्येकवेळी मी ती गोष्ट एकनाथ शिंदे यांना जाऊन सांगयचो. एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला, त्यानंतर त्यांना वाटलं की, माझ्यासोबत ही सगळी लोकं प्रेमाने आली आहेत. ज्यादिवशी एकनाथ शिंदेंचा अपमान झाला तो दिवस वर्धापन दिनाचा होता. वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केलात, त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. ते रागावून निघून गेले होते, तरीही त्यांची परत येण्याची तयारी होती. शिंदे साहेब हा एक सच्चा शिवसैनिक, सच्चा माणूस आहे. त्यांनी सांगितलं होतं की, मला ज्यावेळेस असं वाटायला लागलं की, माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, तेव्हा मी एकच गोष्ट केली असती. मी माझ्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिले असते. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना एक फोन केला असता. त्यांना सांगितलं असतं की, माझी चूक झाली, पण या लोकांची काहीच चूक नाही. त्यानंतर मी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती. असं म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, कशा रितीची माणुसकी त्याच्याकडे असेल? एकाही आमदाराचे राजकीय नुकसान होणार नाही, प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसाच्या पाठिशी लोकं उभी राहणार नाहीत, तर कोणाच्या पाठिशी उभी राहणार, असा सवाल दीपक केसरकर यांनी विचारला.