हे भारतमाते मला माफ कर, म्हणत तिने संपवले जीवन
बातमी महाराष्ट्र

हे भारतमाते मला माफ कर, म्हणत तिने संपवले जीवन

पंढरपूर: देशासह राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हिंगणघाट जळीतकांड प्रकरण असो वा कोपर्डी हत्याकांड महिलांवरील अत्याचाराच्या सर्व सीमा या आरोपींनी ओलांडल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न बघणाऱ्या पंढरपुरातील स्वप्नाली सत्यवान गाजरे या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली आहे. पंढरपूर तालुक्यातील शे‌ळवे गावात उघड झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्वप्नालीने सहा डिसेंबरच्या रात्री गळफास घेतल्यावर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तिच्या मृत्यूची अकस्मात मयत म्हणून नोंद केली. मात्र, १० डिसेंबर रोजी तिच्या दप्तरात सापडलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तिघांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.आता पोलिस स्वप्नालीच्या चिठ्ठीवरून तपास करीत आहेत. या तीन आरोपींत दोन आरोपी विवाहित असून, एकजण पन्नाशीतील आहे. त्यामुळे, या प्रकरणातील गूढ आता वाढत चालले आहे.

‘गावातीलच तिघांमुळे लष्करात जाऊन भारतमातेची सेवा करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे,’ असे दु:ख स्वप्नालीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मांडले आहे. ‘गावातील रमेश गाजरे, स्वप्नील कौलगी आणि लहू टेलर यांच्याकडून सातत्याने छेडछाड होत असल्याने जीवन संपवत आहे. आता मला सहन होत नाही. तिरंगा आणि लष्कराचा गणवेश माझ्या नशिबी नाही. हे भारतमाते मला माफ कर,’ असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नालीच्या वडिलांचा गावात पंक्चर काढण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा अपघात झाल्यावर स्वप्नाली घरकामासोबतच वडिलांना या कामातही मदत करत होती. लष्करात भरती व्हायचे म्हणून ती नियमित व्यायामही करत होती. कोरोनामुळे तिचे अकरावीचे शिक्षण घरूनच सुरू होते. या छेडछाडीचा त्रास ती नववीत असल्यापासून सहन करत होती. याबाबत तिने आई-वडिलांनाही सांगितले होते. वडिलांनी प्रयत्न करूनही छेडछाड थांबली नसल्याने अखेर तिने जीवन संपवले.