अरे बापरे! जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील चित्रांचा रंग उडू लागला, चित्रेही धूसर
बातमी मराठवाडा

अरे बापरे! जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील चित्रांचा रंग उडू लागला, चित्रेही धूसर

औरंगाबादः जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील चित्रांचा रंग उडू लागला आहे. काही चित्रे धूसर होऊ लागल्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाला आता चिंतेने ग्रासले आहे. चित्रांचे आहे त्या अवस्थेत जतन व्हावे, यासाठी येत्या काळात काही ठोस पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अजिंठा येथे बौद्धकालीन लेण्या आहेत. त्यात अप्रतिम चित्रे रेखाटण्यात आली आहेत. चित्रांची रंगसंगती इतकी उत्तम आहे की पर्यटक स्वत:ला विसरून या चित्रांमध्ये रममाण होतो. आता ही चित्र धूसर होऊ लागली आहेत. वातावरणाचा आणि पर्यटकांच्या गर्दीचा हा परिणाम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबाद शहरात नकतीच लेणी मार्गदर्शकांची परिषद पार पडली. या परिषदेत केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक मीनलकुमार चावले यांनी मार्गदर्शन केले. अजिंठा लेणीतील चित्रांचे रंग उडत असल्याबद्दल , चित्रे धूसर होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ‘चित्रांचा हा ठेवा दीर्घकाळ टिकून राहिला पाहीजे त्यासाठी काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे,’ असे संकेत त्यांनी दिले. पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा घालणे, हा त्यातील एक भाग असून शकतो, असे त्यांनी नमूद केले होते.

लेणी पाहण्यासाठी होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे लेणीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढते आणि त्याचा परिणाम चित्रांवर होतो, असे मत त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले होते. लेणी पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. अजिंठा लेणीसाठी उभारण्यात आलेल्या अभ्यागत कक्षात पर्यटकांना, अभ्यासकांना लेणींमधील चित्रांबद्दल माहिती देणे शक्य होईल असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे लेणींमधील चित्र वाचवण्यासाठी येत्या काही महिन्यात पर्यटक व अभ्यासकांच्या संख्येवर , त्यांच्या उपस्थितीवर निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिकृती पाहण्यासाठी आग्रह

अजिंठा लेणीमधील लेणी क्रमांक १, २, १६, १७ या चार लेणींच्या प्रतिकृती अभ्यागत कक्षाच्या जवळ तयार करण्यात आल्या आहेत. पर्यटकांनी, अभ्यासकांनी याच प्रतिकृती पहाव्यात, मूळ लेणीकडे जाण्याचा हट्ट करू नये असा आग्रह देखील पुरातत्व विभागाकडून येत्या काळात केला जाण्याची शक्यता आहे.