दबावामुळे झाली रायगड जिल्हाधिकाऱ्यांची बदली?
बातमी महाराष्ट्र

दबावामुळे झाली रायगड जिल्हाधिकाऱ्यांची बदली?

मुंबई : चक्रीवादळ आणि पुरानंतर पुनर्वसनाचे प्रभावीपणे काम करणाऱ्या रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची राजकीय दबावामुळे बदली करण्यात आल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. त्यामुळे खरंच रायगड जिल्हाधिकाऱ्यांची बदली दबावामुळे झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळ तसेच पुरानंतर रायगड जिल्ह्यात पुनर्वसन आणि नुकसानग्रस्तांच्या मदतीचे काम निधी चौधरी यांनी चांगल्या प्रकारे केले होते. त्यांच्या कामाची प्रशासकीय वर्तुळात दखल घेण्यात आली होती. पण रायगडमधील राजकारण्यांना चौधरी या खुपत होत्या. जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते चौधरी यांच्या कर्तव्यकठोरपणामुळे नाराज होते. त्यांनीच चौधरी यांच्या बदलीचा आग्रह धरला होता, असे समजते. निधी चौधरी यांची मुंबईत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक म्हणून बदली करण्यात आली. रायगडच्या जिल्हाधिकारीपदी महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तविक ठाणे जिल्हाधिकारीपद भूषविल्यानंतर कल्याणकर यांची प्रशासनात ठाण्यापेक्षा कमी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रायगड जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव एम. बी. वरभुवन यांची बदली ठाण्यात आदिवासी आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्तपदी केली आहे. आदिवासी आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त संजय मीना यांची बदली गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांची बदली विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. अजित कुंभार यांची मुंबई महानगरपालिकेच्या सहआयुक्तपदी, अजित पवार यांची बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, संजय दैने यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.