… तर इर्शाळवाडीच्या गावकऱ्यांचे जीव वाचले असते, वन विभागाच्या कारवाईमुळे संकटाच्या खाईत
बातमी महाराष्ट्र

… तर इर्शाळवाडीच्या गावकऱ्यांचे जीव वाचले असते, वन विभागाच्या कारवाईमुळे संकटाच्या खाईत

अलिबाग : दोन वर्षांपूर्वी तळीये येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच सन २०१९मध्ये निसर्गाने दिलेल्या दुर्घटनेच्या इशाऱ्यामुळे येथील अनेक आदिवासी कुटुंबांनी पावसाळ्यात आदिवासी वाडीतील घरे सोडून डोंगराखाली जाऊन राहण्याचा विचार केला होता. पण वन विभागाने त्या पाडल्या व त्यांना पुन्हा इर्शाळवाडीचाच आसरा घ्यावा लागला आणि आता या दुर्घटनेत संपूर्ण वाडीत गडप झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वन विभागाच्या हद्दीतील जागेमध्ये इर्शाळवाडीतील आदिवासींनी झोपड्या बांधल्या होत्या. मात्र इतर वेळी धनिकांना पाठीशी घालणाऱ्या वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या झोपड्या काढून टाकल्या. असे एकदा नव्हे, तर दोन ते तीन वेळा वन खात्याच्या लोकांनी त्यांच्या झोपड्या पाडल्या. अखेर त्यांच्यासमोर कोणता पर्याय राहिला नाही, म्हणून त्यांनी पुन्हा आपल्या आदिवासी वाडीमध्ये जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. जर वन विभागाने किमान पावसाळा संपेपर्यंत त्यांच्या वन जमिनीवर आदिवासींना राहू दिले असते, तर आज या दुर्घटनेमध्ये अनेकांचे प्राण वाचले असते व कुटुंबे उघड्यावर पडली नसती, असे बोलले जात आहे. इर्शाळवाडीवर सन २०१९च्या पावसाळ्यात दरड कोसळण्याची घटना घडली होती. दगड-गोटे व माती खाली उतरली होती. तरीही या आदिवासी वाडीचे नाव दरडग्रस्त यादीमध्ये घेतले गेले नव्हते. त्या अनुषंगाने या भागातील जंगलात वस्ती असलेल्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यास संबंधित अधिकारी पोहोचलेच नसल्याचे समोर आले आहे. या झोपड्या पाडणाऱ्या वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या शक्यता माहीत असूनही त्यांनी झोपड्या पाडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी करीत आहेत.

चौकजवळ सुमारे १ किमी अंतरावर नानिवली आदिवासी वाडी आहे. तिथपर्यंत गाडी जाण्याचा रस्ता आहे. त्यानंतर इर्शाळवाडीपर्यंत पायवाटेने चालत जावे लागते. सुमारे तीन किमीचे चढण आहे. हे अंतर येथील आदिवासी रहिवासी दीड तासांत पार करतात, तर इतरांना हे अंतर पार करण्यासाठी अधिक वेळ लागतो. पावसाळ्यात या वाडीवर जाणारी ही पायवाट निसरडी झाल्याने अंतर कापणे अधिकच अवघड असते. गिर्यारोहक एनडीआरएफ व बचाव यंत्रणा स्वयंसेवकांनी हे अंतर एका तासात पार केले. जंगलाचा भाग असल्याने येथे पावसाचे प्रमाणही नेहमीच अधिक असते. यावर्षीही या भागात सर्वाधिक ४९९ मिमी पाऊस झाला.