पत्रकार बाळ बोठेच्या वाढल्या अडचणी
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पत्रकार बाळ बोठेच्या वाढल्या अडचणी

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अडचणीत आणखीणच वाढ झाली आहे. आता विनयभंगाच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात येईल. उद्या त्याला नगरच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. जरे यांच्या हत्येपूर्वीच विनयभंगाची ही घटना घडली होती. मात्र, हत्येच्या घटनेनंतर संबंधित महिलेने पुढे येऊन फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल झाला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जरे खून प्रकरणात अटकेत असलेल्या बोठेच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यानुसार त्याला आज पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यावेळी न्यायालयात उपस्थित असलेले कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी न्यायालयात अर्ज करून आरोपी बोठे याला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करून देण्याची परवानगी मागितली.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी पोलिसांचा हा अर्ज मंजूर केला. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी बोठे याला ताब्यात घेऊन नगर शहरात आणले. त्याला आता कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्यात येईल. उद्या नगर शहरातील न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.