नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; मात्र, मृत्यूंची संख्या नियंत्रणात येईना
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; मात्र, मृत्यूंची संख्या नियंत्रणात येईना

मुंबई : राज्यातील नवीन रुग्णांची संख्या घटत असल्याचे चित्र दिसत असले तरी मृत्यूचा आकडा काही केल्या नियंत्रणात येताना दिसत नाही. दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकीकडे रिकव्हरी रेट हळूहळू वाढत असताना राज्यातला मृत्यूदर मात्र कमी होत नाहीये. तसेच, मृतांचा आकडा देखील अजूनही मोठाच आहे. मंगळवारी राज्यात ६७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण मृतांचा आकडा ८३ हजार ७७७ इतका झाला आहे. तसेच मृत्यूदर देखील १.५४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज राज्यात सापडलेल्या नव्या २८ हजार ४३८ कोरोनाबाधितांमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५४ लाख ३३ हजार ५०६ इतका झाला आहे. त्यापैकी ४ लाख १९ हजार ७२७ अॅक्टिव्ह रुग्ण असून ४९ लाख २७ हजार ४८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १५ लाख ८८ हजार ७१७ कोरोना चाचण्या केल्या असून त्यापैकी ५४ लाख ३३ हजार ५०६ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट १७.२ टक्के नोंदवण्यात आला आहे.

त्याचबरोबर राज्यात आज ५२ हजार ८९८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ४९ लाख २७ हजार ४८० इतका झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहे!