वाढदिवसादिवशीच सोनाली अडकली बंधनात; अवघ्या १५ मिनिटांत ऑनलाईन केलं लग्न
मनोरंजन

वाढदिवसादिवशीच सोनाली अडकली बंधनात; अवघ्या १५ मिनिटांत ऑनलाईन केलं लग्न

मुंबई : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज (ता. १८) वाढदिवसादिवशीच लग्नबंधनात अडकली आहे. कुणाल बेनोडकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिने या लग्नसोहळ्याबद्दलच्या काही अनोख्या गोष्टीही सांगितल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने लग्नातले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या या अनोख्या लग्नसोहळ्याबद्दलही सांगितलं आहे. ती म्हणते, अब से हम 7 मे. तर आम्ही जूनमध्ये यूकेला लग्न करणार होतो. पण तिथल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तारीख पुढे करावी लागली, मग जुलैमधली तारीख ठरली. कुणालबरोबर बसून लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शूटिंग संपवून दुबईला आले आणि भारतात दुसरी लाट आली. आणि मी पुन्हा दुबईला अडकले. जुलैपर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून एप्रिलमध्ये यूकेने भारतीयांच्या प्रवासावर बंदी आणली. क्वारंटाईन, प्रवासावरती बंदी, परिवाराला धोका, लग्नासाठी होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम, या सगळ्याचा विचार करुन आम्ही आमचा भला मोठा लग्न सोहळा रदद करण्याचा निर्णय घेतला. आता जुलैमध्ये लग्न करणार होतो पण मेमध्येच लग्न करुन आम्ही सगळ्यांना धक्का दिला आहे.

आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून लग्न जास्त महत्वाचं आहे ना की समारंभ. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलाही सोहळा करु शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही. आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही…आत्ताच शिक्का मोर्तब करुन टाकू. २ दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटांत आणि चार लोकांच्या साक्षीने वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून (लग्नाच्या मान्यतेसाठी मंदिराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱे विधी) लग्नाच्या प्रमाणपत्रावर सही केली.

सोनालीच्या परिवाराने या सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचंही तिने शेअर केलेल्या फोटोंमधून दिसत आहे. तिच्या सर्व सहकलाकारांनी, मित्रमंडळींनी आणि, चाहत्यांनी तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.