राज्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सदस्य नोंदणीस प्रारंभ; पत्रकारांनी नोंदणी केल्यास, त्वरित मिळणार प्रमाणपत्र
महाराष्ट्र

राज्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सदस्य नोंदणीस प्रारंभ; पत्रकारांनी नोंदणी केल्यास, त्वरित मिळणार प्रमाणपत्र

मुंबई (प्रतिनिधी) : तेवीस राज्यांत, १८ हजार पत्रकाराचे जाळे विणणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्र राज्यातील सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला आहे. एका लिंकवर सदस्य नोंदणी होणार आहे. सदस्य नोंदणी केल्यावर ई-मेल आयडीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सदस्यत्व प्रमाणपत्र त्वरित मिळणार आहे. सदस्यत्वासाठी कोणतेही शुल्क नाही. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने राज्यातल्या सर्व पत्रकारांना ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे सदस्य व्हा? असे आवाहन करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने राज्यभरात गेल्या वर्षभरात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘थेट कृती कार्यक्रम’ यावर अधिक भर देत, पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने उचललेले पाऊल राज्यभरातल्या सर्व पत्रकारांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरलेले आहे. साडेचार हजार पत्रकारांना दहा लाख रुपयांची पॉलिसी देण्याचे काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे. पत्रकारांचे घर, पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांची स्किलिंग, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर काय? या अशा अनेक विषयांवर आवाज उठवत राज्यभरात चार हजारांहून अधिक पत्रकारांपर्यंत कृतिशील कार्यक्रम घेऊन जाण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ला प्रचंड यश मिळत आहे.

अनेक वेळा उपक्रम राबवताना पत्रकारांची माहिती, तो कुठे काम करतो. ही माहिती ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उपक्रम राबवणाऱ्या टीमला नसते, ती आवश्यक आहे. शिवाय संघटनात्मक बांधणीसाठी ही नोंदणी आवश्यक आहे. https://forms.gle/yepv7C2oUj83z2Rp9 या लिंक वर जाऊन तुम्ही क्लिक केले की, तुमच्याबद्दलची माहिती विचारली जाणार. ती माहिती तुम्ही भरून द्यायची आहे. फॉर्म भरल्यावर तुम्ही जो ई-मेल आयडी देणार आहात, त्या ई-मेल आयडीवर काही क्षणातच तुमचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल. नोंदणी जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा सर्व सदस्यांची अधिकची माहिती घेण्याबाबतची विनंती त्या त्या जिल्हाध्यक्षांना करण्यात येईल. त्यानंतर मग पुन्हा प्रमाणपत्र दिलेल्या सदस्यांना आयकार्ड आणि मदत देण्याबाबतची भूमिका ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ घेणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजा माने यांचा आज पहिला फॉर्म भरून या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना राजा माने म्हणाले की, येत्या पंधरा दिवसांमध्ये राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे सदस्य अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी अगदी शेवटच्या पत्रकारापर्यंत जाऊन या सदस्य नोंदणी संदर्भातली मोहीम राबवावी. शेवटच्या पत्रकारापर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी झाली की, आपल्याला कृतिशील कार्यक्रम तातडीने आखता येईल.
नोंदणी का आवश्यक आहे?

आगामी वर्षभरामध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक पत्रकाराच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ काही सामाजिक संस्था, केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने पत्रकारांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी काही महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व पत्रकारांची माहिती असणे आवश्यक आहे. ही संपूर्ण माहिती एकत्रित केली जाईल. त्या माहितीच्या माध्यमातून कृतिशील कार्यक्रम आखायला सोपे जाईल, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी या नोंदणी अभियानाच्या शुभारंभप्रसंगी दिली. देशातल्या सर्व राज्यांत २६ जानेवारीपासून सदस्य नोंदणीला सुरुवात झाली, असेही संदीप काळे यांनी या प्रसंगी सांगितले.