राज्यातील कोरोग्रस्तांच्या आकड्यात पुन्हा वाढ; राज्यात १लाखांहून अधिक ॲक्टिव्ह रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोग्रस्तांच्या आकड्यात पुन्हा वाढ; राज्यात १लाखांहून अधिक ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात पुन्हा वाढ झाली आहे. आज दिवसभरात राज्यात ९ हजार ४८९ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ८ हजार ३९५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, अद्यापही राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत दररोज भर पडताना दिसत आहे. राज्यात आज १५३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.०१टक्के एवढा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ५८ लाख ४५ हजार ३१५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १ लाख १७ हजार ५७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी २३ लाख २० हजार ८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ८८ हजार ८४१ (१४.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३२ हजार ९४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४४२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज (ता. ०३) नोंदविली आहे. रात्री आठ वाजेपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला आहे. अंतिम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या ८ लाखावर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ५७ हजार ३७२ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे.