मोठी बातमी : सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक
बातमी मुंबई

मोठी बातमी : सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं सापडली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांची शनिवारी सकाळपासून एनआयएकडून चौकशी सुरू होती. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर वाझे यांना अटक करण्यात आली असून, त्यांनीच अंबानींच्या घराजवळ गाडी उभी केली होती, असा आरोप एनआयएने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी नवीन वळण मिळालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते. तिथे तब्बल १२ तास मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनआयएच्या एका अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिली आहे. वाझे यांना रविवारी सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर कारमिखाइल रोडवर स्फोटकांसह स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाझे यांच्यावरील अटकेच्या कारवाईने एकच खळबळ उडाली असून हा राज्य सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. वाझे यांच्यावर या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते. वाझे यांना निलंबित करून अटक करा अशीही मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आधी चौकशी मग शिक्षा असा पवित्रा घेत सरकारने वाझे यांची केवळ खात्यांतर्गत बदली केली होती. आता वाझे यांना एनआयएने अटक केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.