चर्चा शिवसेना-एमआयएम युतीची; पण विजय भाजपचाच
राजकारण

चर्चा शिवसेना-एमआयएम युतीची; पण विजय भाजपचाच

अमरावती : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करणाऱ्या एमआयएम सोबतच अमरावती महानगरपालिकेत शिवसेनेनं युती केल्याने राज्यभर चर्चेला उधाण आले होते. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेना, AIMIM, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी जय्यत तयारी केली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एरवी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवसेना आणि एमआयएमने एकत्र येऊन भाजपविरोधात आखलेली रणनीती चर्चेचा विषय ठरत होती. परंतु, ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये भाजपचाच उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर निवडून आला आणि विरोधकांचा डाव फसला. परंतु शिवसेना-एमआयएमची ही युती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.

अमरावती महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. परंतु, महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस, शिवसेना, बसप आणि एमआयएम या पक्षांनी एकत्र येऊन भाजपसमोर आव्हान उभं केलं. ११ मार्चला ही निवडणूक पार पडली. ऐनवेळी स्थायी समितीच्या निवडणुकीत महापालिकेत चांगलंच नाट्य पहायला मिळालं. ऐनवेळी बसपचे नगरसेवक चेतन पवार अनुपस्थित राहिले. यावेळी भाजपमधील नाराज नगरसेवक मतदानाला हजर राहणार नाहीत असा सर्वांना अंदाज होता. विरोधकांचा हा अंदाजही चुकला आणि भाजपचे उमेदवार शिरीष रासने ९ मतांसह स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर निवडून आले. अमरावती महापालिकेत भाजपचे ८ नगरसेवक असून स्थानिक पक्षाच्या एका उमेदवाराचाही भाजपला पाठिंबा आहे. त्यामुळे राज्यात सध्या शिवसेना-एमआयएमच्या या फसलेल्या प्रयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे.