सिनेस्टाईल पाठलाग करुन नागपूरच्या लेडी डॉनची भररस्त्यात हत्या
बातमी विदर्भ

सिनेस्टाईल पाठलाग करुन नागपूरच्या लेडी डॉनची भररस्त्यात हत्या

नागपूर : नागपूरमध्ये कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु असतानाच गुन्हेगारीचे सत्रही सुरू असल्याचे समोर आले आहे. शहरातील पाचपावली भागात एका लेडी डॉनचा गुंडांनी पाठलाग करून चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं नागपूर शहर हादरलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पिंकी वर्मा असं या लेडी डॉनचे नाव आहे. पाचपावली भागात एक तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा लोकांच्या दारात, घरात व मोहल्ल्याच्या रस्त्याने पळत होती आणि गुंड चाकू घेऊन तिच्या पाठीमागे धावत होते. ती किंचाळत होती. मदतीची याचा करत होती, पण कोणी तिच्या मदतीला धावून आले नाही. गुंड तिच्या शरीरावर चाकूने सपासफ वार करत तिचा पाठलाग करत होते. शेवटचा प्रयत्न म्हणून ती स्वतःच्या घरात शिरली. गुंडांनी तिथे पण तिचा पिच्छा सोडला नाही. जखमेतून निघणाऱ्या रक्ताने ती रक्ताने भिजली, चाकूच्या वाराने तिचे कपडे फाटले व शेवटी खाली कोसळली. गुंडांनी आणखी वार केले व तेथून निघून गेले. रुग्णालयात पोहचण्या आधीच तिने प्राण सोडला.

कोण होती पिंकी वर्मा?
पिंकी वर्मा अत्यंत आक्रमक होती. बोलायला वाचाळ होती. तिची स्वतःची गॅंग होती. त्या जोरावर ती अवैध धंदे चालवत होती. तिच्या गँगमधल्या अनेक सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल होते. पिंकीची गॅंग दारू विक्री, जुगार भरवणे यासारख्या अवैद्य धंदे करत होती. त्यामुळे स्थानिक विरोधी टोळीच्या सदस्यांसोबत तिचे खटके उडत असे. मात्र, पिंकी ही महिला असल्याने अनेकांनी सुरवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र हळूहळू परिसरात पिंकी वर्माचा गुन्हेगारी जगतातील व्याप व दरारा वाढत चालला होता. तिची अनेक गुन्हेगारांसोबत उठबस वाढली होती. कोरोना काळात दारूची दुकाने बंद असल्याने तिचा अवैध दारूचा धंदा तेजीत होता. हे विरोधातील टोळीला पचनी पडत नव्हते.