पण, तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद
देश बातमी

पण, तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. अभिभाषणाची सुरुवात करताना राष्ट्रपतींनी सर्वात आधी गेल्या वर्षभरात कोरोना, देशाच्या सीमा भागांतील तणाव यांसारख्या अनेक संकटांचा उल्लेख केला. त्याचसोबत राष्ट्रपती म्हणाले की, “एवढ्या संकटांनंतरही देश एकजुटीने उभा आहे. आव्हान कितीही मोठं असलं तरीही आम्ही थांबणार नाही आणि भारतही थांबणार नाही.” अशी विश्वास व्यक्त केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर त्याचवेळी केंद्रीय कृषी कायद्यांच्या निर्णयाचे कौतुक करत कृषी कायद्यांच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रपती कोविंद आपल्या अभिभाषणात बोलताना म्हणाले, “सखोल चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा १० कोटी पेक्षा जास्त छोट्या शेतकऱ्यांना तात्काळ मिळणं सुरू झालं आहे. छोट्या शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता.”

ते पुढे म्हणाले की, “नवीन कृषी कायद्यांची अंमलबजाणी करण्यापूर्वी जी व्यवस्था, जे अधिकार व सुविधा अस्तित्वात होत्या, त्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत आहे. या कृषी सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकारही दिले आहेत.” असं राष्ट्रपतींनी अभिभाषणातून स्पष्ट केलं.

तथापि, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयानं या कायद्यांना स्थगिती दिली आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून त्याचं पालन करेल. कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्पष्ट केलं.

“सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा देशातील लहान शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. संसदेने कृषी विधेयकं मंजूकर केली असून या नव्या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.”तसेच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले.