पुण्यात कोरोना हाताबाहेर? उपलब्ध नाही एकही व्हेंटिलेटर बेड
कोरोना इम्पॅक्ट बातमी

पुण्यात कोरोना हाताबाहेर? उपलब्ध नाही एकही व्हेंटिलेटर बेड

पुणे : राज्यात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु असून अशात राज्यात पुण्यात परिस्थिती सर्वाधिक गंभीर बनली आहे. रोज समोर येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, हॉस्पिटल हाऊस फुल्ल झाले आहेत. आयसीयू आणि व्हेंटिलटेर बेडच्याबाबतीत तर पुण्यात संकटाला सुरुवातही झाली आहे. कारण सोमवारी सायंकाळचा विचार करता पुणे मनपा हद्दीत एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याची स्थिती पाहायला मिळाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्यात जवळपास 21 हजारांहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पण यापैकी व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्या ही केवळ 489 आहे. सोमवारी सायंकाळची स्थिती पाहता यापैकी एकही बेड शिल्लक नसल्याचं समोर आलं. रात्री उशिरानंतर यापैकी काही बेड उपलब्ध झाले. पण आता हे बेड फुल व्हायला सुरुवात झाल्याचं दिसत आहे.

आयसीयू बेडचा विचार करता पुण्यात महापालिका आणि खासगी रुग्णालयात मिळून एकूण 430 आयसीयू बेड आहेत. त्यापैकी सोमवारी रात्री केवळ 2 उपलब्ध होते. त्यामुळं आयसीयू बेडची स्थितीही गंभीर असल्याचं पाहायला मिळालंय. व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची पुण्यातील रुग्णालयात मात्र उपलब्धता असल्याचं पाहायला मिळालं आहे. सोमवारी या रुग्णालयांमध्ये 90 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होते. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.