तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाउन!
बातमी महाराष्ट्र

तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाउन!

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करून साधारणपणे ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ कडक टाळेबंदी जाहीर केली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मांडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य कृती दलाचे डॉक्टर, आयसीएमआरचे तज्ज्ञ तसेच मुख्य सचिव सिताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोकल प्रवासाला परवानगी, हॉटेलची वेळ याशिवाय प्रमुख चर्चा झाली ती तिसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय अंगाने कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याची. यावेळी आयसीएमआरच्या अभ्यासगटातील मुकेश मेहता यांनी राज्याची आरोग्य व्यवस्था व करोना उपचारातील त्रुटींवर नेमके बोट ठेवले. तसेच तिसरी लाट अडविण्यासाठी करायच्या उपाययोजनांवर मेहता, डॉ शशांक जोशी, डॉ संजय ओक आदींनी आपली भूमिका मांडली.

यानंतर सिताराम कुंटे म्हणाले, तिसऱ्या लाटेविषयी वैद्यकीय तज्ज्ञ वेगवेगळे अंदाज बांधत आहेत, मात्र दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनचा वापर हा कळीचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे यापुढे ऑक्सिजनची उपलब्धता आणि रुग्णसंख्या यांचे गणित निश्चित करून तात्काळ टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. अर्थव्यवस्था व दैनंदिन व्यवहाराला गती द्यावीच लागेल, मात्र कोरोनाची लाट आल्यास कोणताही उशीर वा चर्चेत वेळ न घालविता तात्काळ टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे कुंटे यांनी सांगितले.

याबाबत सिताराम कुंटे यांनी एक उदाहरण सांगितले. कुंटे म्हणाले, समुद्रात मोठी लाट आल्यास आपण खाली बसून श्वास रोखून धरतो व लाट गेल्यानंतर पाण्यावर येऊन पुन्हा श्वास घेतो. करोनाचा सामना आपल्याला आता नेमके असेच करावे लागणार असल्याचे कुंटे म्हणाले.