ऑन-ड्यूटी पोलीस कर्माचाऱ्याची मुंबईत गोळी झाडून केली आत्महत्या
बातमी मुंबई

ऑन-ड्यूटी पोलीस कर्माचाऱ्याची मुंबईत गोळी झाडून केली आत्महत्या

मुंबई : मुंबईत ऑन ड्यूटी कॉन्स्टेबलनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ड्युटीवर असताना पोलीस स्टेशनमध्येच गोळी झाडून घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. सखाराम भोये असं आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सकाळी 6 वाजता ही घटना उघडकीस आली. सखाराम भोये हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्यानं एवढे टोकाचं पाऊल का उचललं असावा, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. सखाराम भोये 2003 च्या बॅचचे होते. ते नाशिकमधील हरसूल गावचे रहिवासी होते. 2016पासून तुळींज पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. बुधवारी त्यांची रात्रपाळी होती. रात्रपाळी संपून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी सरकारी पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली.

त्याच्या पश्चात त्यांची दोन मुलं पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर काही कामाचा ताण होता का की अन्य काही कारण होतो याचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती मीरा-भाईंदर, वसई -विरारचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली आहे.