दिलासादायक ! जगातील सर्वात वेगवान लसीकरण भारतात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! जगातील सर्वात वेगवान लसीकरण भारतात

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण जग अडचणीत सापडले असताना भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक वेगवान करोना प्रतिबिंधक लसीकरण मोहिम राबवणारा देश ठरला आहे. भारतात केवळ सहा दिवसांत भारतात १० लाख कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज (ता. २८) दुपारी २ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतानं आजवर २५ लाखांहून अधिक लसीचे डोस दिले आहेत. देशात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असून सध्या देशभरात १ लाख ७५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी होण्याचा हा ट्रेन्ड कायम आहे. देशातील दोन राज्यांमध्ये सध्या ४० हजार आणि त्याहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या दोन राज्यांमध्ये देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६७ टक्के रुग्ण आहेत. यामध्ये केरळमध्ये ७२ हजार तर महाराष्ट्रात ४४ हजार आहेत. देशातील करोनाबाधितांचे प्रमाण ५.५१ टक्के असून ते सातत्याने कमी होत आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, १० लाख जणांना आपण सहा दिवसांत लस दिली. अमेरिकेनं ती १० दिवसांत, स्पेननं १२ दिवसांत, इस्रायलनं १४ दिवसांत, युकेनं १८ दिवसांत, इटलीनं १९ दिवसांत, जर्मनीनं २० दिवसांत तर यासाठी युएईला २७ दिवस लागले.