केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मोठी घोषणा; जेईई मेन परीक्षेच्या तारखांत बदल
देश बातमी

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मोठी घोषणा; जेईई मेन परीक्षेच्या तारखांत बदल

नवी दिल्ली : माजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी काही दिवसांपूर्वीच जेईई मेन परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. या तारखांनुसार जेईईची मेनच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलैपासून २५ जुलै या कालावधीत होणार होत्या. तर जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्ट यादरम्यान होणार होत्या. मात्र, त्या तारखांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. नवे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. तसेच, या परीक्षांसाठीचे अर्ज भरण्यासाठी देखील मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

असे असतील नवीन बदल
धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यातील तारखा त्याच राहणार आहेत. म्हणजेच, तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलै ते २५ जुलै यादरम्यानच होणार आहेत. मात्र, चौथ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार चौथ्या टप्प्यातील परीक्षा २६ ऑगस्ट, २७ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर या दिवशी घेण्यात येतील. एकूण ७ लाख ३२ हजार परीक्षार्थींनी जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती देखील धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

दरम्यान, परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्यानंतर त्यासाठीच्या नोंदणीसाठीच्या मुदतीमध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर दिली आहे. जेईई मेनच्या चौथ्या सेशनसाठीची नोंदणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. पण आता परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्यामुळे नोंदणीची मुदत देखील २० जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.