देशात एका दिवसात दिली तब्बल एवढ्या जणांना कोरोना लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात एका दिवसात दिली तब्बल एवढ्या जणांना कोरोना लस

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेगही मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत देशात ३६.७ लाख लोकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत एका दिवसात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत गेल्या २४ तासात ३६ लाख ७१ हजार २४२ जणांना लस देण्यात आली असून त्यातील ३३ लाख ६५ हजार ५९७ जणांना पहिली मात्रा दिली आहे. त्यासाठी ५१ हजार २१५ लसीकरण सत्रे घेण्यात आली. ३ लाख ५ हजार ६४५ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एका दिवसातील लसीकरणाचा हा उच्चांक आहे. ६.८७ कोटी म्हणजे ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ लोकांना लस देण्यात आली आहे, त्यासाठी ११,३७,४५६ सत्रे घेण्यात आली.

दरम्यान, भारत बायोटेक या हैदराबादेतील कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लशीच्या तिसऱ्या मात्रेसाठी (बुस्टर डोस) चाचण्यांना भारताच्या महा औषधनियंत्रकांनी मान्यता दिली आहे. या लशीच्या तीन टप्प्यातील चाचण्या पूर्ण होण्यापूर्वीच तिच्या वापरास आपत्कालीन मंजुरी देण्यात आली होती.