औषधाची बाटली समजून प्यायले औषध; पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैर्वी मृत्यू
पुणे बातमी

औषधाची बाटली समजून प्यायले औषध; पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैर्वी मृत्यू

बारामती : बारामती तालुका पोलीसांत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोपट विष्णू दराडे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोपट दराडे रूजू होते. दराडे यांना सोमवारी रात्री खोकल्याचा त्रास होत होता. खोकल्याचे औषध समजून दराडे यांनी शेतात फवारणी करण्यासाठी आणलेले टु-फोर्टी हे विषारी औषध प्राशन केले. काही वेळांनी त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले आणि या बाटलीतील औषध प्यायले, अशी माहिती दिली.

ज्या बाटलीतून ते औषध प्यायले होते त्यामध्ये फवारणीचे औषध असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, दराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दराडे यांच्या अकास्मीत निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस कर्मचारी दराडे यांचे मुळगाव इंदापूर तालुक्यातील अकोले हे आहे. दराडे यांना दोन मुले पत्नी असून त्यांनी पोलीस सेवेत 24 वर्ष आपली सेवा बजावली होती.