पुण्यातील आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; असा फसला डाव
पुणे बातमी

पुण्यातील आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; असा फसला डाव

वाई : पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून हा डाव मात्र फसला आहे. आमदारांना एका युवतीच्या साह्याने हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळण्याचा कट तिघा युवकांनी रचला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय आहे प्रकरण?
शेलपिंपळगांव ता. खेड जि. पुणे येथील मयुर साहेबराव मोहिते पाटील यांचे सख्खे चुलते दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील हे विद्यमान आमदार आहेत. मयूर मोहिते-पाटील यांना दि. 22 रोजी पूजा नामक युवतीने फोन केला व सांगितले की बारा दिवसांपूर्वी शैलेश मोहिते-पाटील रा.सांगवी जि.पुणे व राहुल कांडगे रा. चाकण यांनी संबंधित युवतीला पैसे व फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून आ. दिलीप मोहिते-पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये ओढून पैसे उकळण्यास सांगितले होते. परंतु, हे मान्य नसल्याचे सांगत युवतीने मयूर यांना सर्व हकीकत सांगितली.

त्यानंतर 23 तारखेला मयूर व चुलते राजेंद्र मोहिते-पाटील हे सातारा येथे संबंधित युवतीला भेटले व याबाबत विचारपूस केली. यावेळी संबधित युवतीने सांगितले की, १२ तारखेला सकाळी साडेअकराच्या सुमारास युवतीच्या फ्लॅटवर तिचा मित्र सोमनाथ दिलीप शेडगे हा दोन व्यक्तींना घेवून आला व त्यांची नावे शैलेश शिवाजीराव मोहिते-पाटील रा. सांगवी, जि. पुणे व राहूल किसन कांडगे, रा. चाकण, जि. पुणे अशी सांगितली. यानंतर शैलेश मोहिते-पाटील व राहुल कांडगे यांनी युवतीला सांगितले की, आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याकडे नोकरी मागण्याकरीता जावून जवळीक साधून, त्यांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन बदनामीची भिती घाल. असे सांगून तसा प्लॅन त्यांनी केला. त्या बदल्यात युवतीला पैसे व पुण्यात नवीन फ्लॅट घेवून देवू असे सांगितले व लागलीच 20 हजार दिले. त्यापैकी सोमनाथ शेडगे याने 5 हजार घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा शैलेश मोहिते-पाटील यांनी सोमनाथ शेडगे याच्याकडे 40 हजार दिले. त्यापैकी युवतीला सोमनाथने 22 हजार दिले. त्यानंतर शैलेश मोहिते-पाटील यांनी युवतीच्या बँक अकाऊंटवर 30 हजार पाठवले. त्यापैकी 24 हजार 400 रुपये गुगल पे ने सोमनाथ शेडगे याला युवतीने पाठविले आहेत.

असा फसला डाव!
संबंधित युवतीनेच आमदारांच्या पुतण्याला याची माहिती दिल्याने कट उघडकीस आला. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात पुतण्याने दिलेल्या तक्रारीवरून शैलेश शिवाजीराव मोहिते-पाटील रा. सांगवी जि. पुणे, राहुल किसन कांडगे रा. चाकण जि. पुणे व सोमनाथ दिलीप शेडगे रा. सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.