दिल्लीतील परिस्थिती बिकट; लॉकडाउनमध्ये वाढ
देश बातमी

दिल्लीतील परिस्थिती बिकट; लॉकडाउनमध्ये वाढ

नवी दिल्ली : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीतील परिस्थिती एका आठवड्याच्या लॉकडाउननंतरही कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिल्लीतील लॉकडाउन एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या दिल्लीची चौथ्या लाटेनं झोप उडवली आहे. कधी नव्हे इतकी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून, मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर केजरीवाल सरकारने लॉकडाउन न लावण्याची भूमिका घेतली होती. मात्र, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्यानंतर रुग्णालयावर अतिरिक्त भार पडू लागला. त्यानंतर सरकारने तातडीने लॉकडाउन लागू केला होता.

दिल्लीत मागील एका आठवड्यांपासून लॉकडाउन लागू केलेला आहे. या काळात दिल्लीत रुग्णसंख्येत कोणतीही घट झालेली नाही. उलट ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहेत. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाले असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने लॉकडाउन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषदे घेऊन याची माहिती दिली. आता पुढील सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे.