आरोग्य विभागाच्या परीक्षेपूर्वी राजेश टोपेंच विद्यार्थ्यांना आवाहन
बातमी महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परीक्षेपूर्वी राजेश टोपेंच विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागातील विविध पदे भरण्यासाठी रविवारी २८ फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षार्थींना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छापर संदेश दिला आहे. यासोबत त्यांना एक महत्त्वाचे आवाहनही केले आहे. परीक्षार्थींनी धीर देण्याचा आणि गुणवत्तेलाच प्राधान्य असल्याचा विश्वास देण्याचं काम टोपे यांनी केलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांनी एका पत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छापर संदेश दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, ”सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, फक्त गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा.

दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाने २०१९ मध्ये भरतीसाठी अर्ज मागविले होते. तसेच उमेदवारांना पद भरतीच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असणा-या विविध पदांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ५ ते ६ पदांसाठी अर्ज केले आहेत. मात्र कोरोना महामारीच्या कालावधीत कोणत्याही परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. अखेर, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने जाहिरात काढून परीक्षेची भरतीप्रक्रिया राबवली.

त्यानुसार, उद्या रविवार 28 फेब्रुवारी रोजी राज्यभरात 5 हजार जागांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे.
दरम्यान, या भरतीप्रक्रियेत उमेदवारांना दोन पदांसाठी अर्ज करता येईल, असेदेखील आरोग्य विभागाने सांगितले त्यानुसार उमेदवारांनी दोन पर्यायांची निवड केली. उमेदवांना परीक्षांचे प्रवेशपत्र २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन उपलब्ध झाले. त्यात दोन्ही परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी होणार असून दोन्ही पदांच्या परीक्षेच्या वेळा, उमेदवारांचे नाव, बैठक क्रमांक सारखे देण्यात आले आहेत. मात्र, परीक्षा केंद्र दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. एकाच वेळी दोन ठिकाणी परीक्षा देणे शक्य नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.