दिलासादायक ! रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत घट; असे असतील नवीन दर
देश बातमी

दिलासादायक ! रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत घट; असे असतील नवीन दर

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण आणि नातेवाईकांची ससेहोलपट पाहून सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करण्याऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. यामुळे करोना रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता कंपन्यांचे नवे दर कसे असतील वाचा
– कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड रेमडॅक इंजेक्शनचा दर २८०० रुपयांवरून ८९९ रुपये केला आहे.
– सिपला लिमिटेडनं सिप्रेमी इंजेक्शनचा दर ४००० रुपयांवरून ३००० रुपये इतका केला आहे.
– सिजीन इंटरनॅशनल लिमिटेडनं रेमविन इंजेक्शनचा दर ३९५० रुपयांवरुन २४५० रुपये इतका केला आहे.
– डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीज लिमिटेडनं रेडिक्स इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून २७०० इतका केला आहे.
– मायलॅन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेडनं डेसरेम या इंजेक्शनचा दर ४८०० रुपयांवरून ३४०० इतका केला आहे.
– ज्युबिलँट जेनेरिक लिमिटेडनं जुबी-आर इंजेक्शनचा दर ४७०० रुपयांवरून ३४०० रुपये इतका केला आहे.
– हेटेरो हेल्थकेअर लिमिटेडनं कोविफोर या इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून ३४९० रुपये इतका केला आहे.

डिसेंबर २०२०मध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर रेमडेसिवीर तयार करण्याऱ्या कंपन्यांनी उत्पादन घटवलं होतं. त्यात कोरोनाची दूसरी लाट आल्याने रेमडेसिवीरची मागणी वाढली. तसेच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्याच्या निर्यातीवर रविवारी बंदी घातली. या इंजेक्शनची साठेबाजी आणि काळ्याबाजाराला आळा घालण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत.