सचिन वझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी; वाचा सविस्तर
बातमी महाराष्ट्र

सचिन वझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी; वाचा सविस्तर

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक करत न्यायालयात हजर केले. या प्रकरणी न्यायालयाने सचिन वझे यांना 25 तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयएने सचिन वझे यांची १४ दिवसांसाठी कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने केवळ दहा दिवस म्हणजेच, 25 तारखेपर्यंत सचिन वाझे यांनी एनआयए कोठडी सुनावली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वझे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अशातच १३ मार्च रोजी रात्री उशिरा सचिन वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. अशातच आज त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असून एनआयएकडून त्यांना 25 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

सचिन वाझे काल (13 मार्च) सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज (14 मार्च) सकाळी त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं. अखेर कोर्टानं त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

NIA ने सचिन वाझे यांच्यावर आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये कलम 286- जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे, कलम 465 – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती, कलम 506(2) – दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे, कलम 120 B – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे, स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे याचा समावेश आहे.

तर, तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एनआयएने जी इनोव्हा गाडी काल रात्री ताब्यात घेतली तीच गाडी अँटिलियाजवळ दिसली होती. हीच गाडी पोलिस हेड ऑफिसमध्ये देखील दिसून आली होती. ही इनोव्हा गाडी CIU म्हणजे क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची असल्याचं समोर आलं आहे. याच गाडीचा वापर सचिन वाझे आणि त्यांची टीम करत होती. विशेष बाब म्हणजे, घटनेनंतर ही गाडी कुणाच्या नजरेत येऊ नये, या उद्देशाने या इनोव्हाला पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेअरिंगसाठी पाठवलं होतं. या सर्व गोष्टींचा खुलासा झाल्यानंतर अनेकांवर कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे.