मोदींच्या लोकप्रियतेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका
देश बातमी

मोदींच्या लोकप्रियतेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारवर सातत्याने टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेलाही याचा फटका बसल्याचं दिसत आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्राला आलेल्या अपयशाच्या आरोपांमुळे कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेतील कंपनीच्या ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंगच्या आकडेवारीनुसार मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे. तर अन्य एका सर्वेक्षणामध्ये पहिल्यांदाच मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख ५० टक्क्यांच्या खाली उतरला आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंगची ताजी आकडेवारी समोर आली आहे.

या १३ देशांच्या राष्टाध्यक्षांमध्ये मोदी सर्वाधिक लोकप्रिय असले तरी १ एप्रिल ते ११ मे दरम्यान त्यांच्या लोकप्रियतेमध्ये १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. १ एप्रिलपूर्वी मोदींची लोकप्रियता म्हणजेच अ‍ॅप्रूवल रेटिंग ७३ टक्के इतकी होती. मात्र ११ मे रोजी त्यामध्ये १० टक्क्यांची घसरण होऊन ती ६३ वर आली. म्हणजेच एक मे ते ११ मे दरम्यान मोदींचे अ‍ॅप्रूवल रेटींग १० टक्क्यांनी कमी झालं. मोदींच्या डिसअ‍ॅप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक मे आधी २१ टक्क्यांवर असणारी हे रेटींग ११ मे नंतर ३१ टक्क्यांवर पोहचली आहे.

यापूर्वी मोदींची लोकप्रियता नोटबंदी, कृषी कायदे, सुधारित नागरिकत्व कायदा यासारखे निर्णय आणि त्यानंतर उडालेल्या गोंधळानंतरही कायम राहिली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका मोदींच्या लोकप्रियतेला बसल्याचं या दोन्ही सर्वेक्षणांमधून दिसून येत आहे.