धक्कादायक ! पुण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यासह घरातील चौघांचे कोरोनामुळे निधन
पुणे बातमी

धक्कादायक ! पुण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यासह घरातील चौघांचे कोरोनामुळे निधन

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून पुण्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले श्यामसुंदर लक्ष्मण कुचेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे महापालिका आरोग्य सेवेत ते कार्यरत असताना आणि आपली जबाबदारी पार पडत असताना कुटुंबतील सर्वांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यांचे वडील लक्ष्मण कुचेकर, आई सुमन कुचेकर आणि भाऊ विजय लक्ष्मण कुचेकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील ४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

शामसुंदर कुचेकर यांचे निधन काल (ता. २२) सकाळी नोबल हॉस्पिटलमध्ये झाले. त्यानंतर कालच त्यांच्या भावाचे म्हणजेच विजयकुमार यांचे जंबो कोविड सेंटर येथे काल (ता. २२) दुपारी निधन झाले. तत्पूर्वी, १६ एप्रिल रोजी आईचे जहांगीर हॉस्पिटलला आणि वडिलांचे ०९ एप्रिल रोजी जंबो कोविड सेंटरला निधन झाल होते.