श्रद्धाचं शिर कुठे फेकलं? पोलिसांना लोकेशन समजलं; पण शोधण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार
देश बातमी

श्रद्धाचं शिर कुठे फेकलं? पोलिसांना लोकेशन समजलं; पण शोधण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार

नवी दिल्ली: मूळची वसईची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येमुळे देश हादरला. २६ वर्षांच्या श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब पुनावालानं दिल्लीत हत्या केली. श्रद्धा-आफताब दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहत होते. जवळपास सहा महिन्यांनी श्रद्धाच्या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आफताबनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचं आव्हान दिल्ली पोलिसांसमोर आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आफताबला शिक्षा व्हावी यासाठी दिल्ली पोलिसांना भक्कम पुराव्यांची गरज आहे. श्रद्धाचं शिर पोलिसांना अद्याप सापडलेलं नाही. त्यानं हत्येसाठी वापरलेलं हत्यारदेखील हाती लागलेलं नाही. आफताबविरोधातील ठोस पुराव्यांचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलीस महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह एक तलाव उपसणार आहेत. छत्तरपूर एनक्लेव्ह येथे असलेल्या तलावात आफताबनं श्रद्धाचं शिर फेकलं अशी माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलीस कामाला लागले आहेत. तलाव रिकामा करण्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनानं यंत्रणा कामाला लावली आहे.

श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. त्याची दुर्गंधी पसरू नये म्हणून ३०० लीटरचा फ्रीज खरेदी केला. सगळे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर दररोज रात्री २ वाजता घरातून बाहेर पडून एक एक तुकडा काही अंतरावर असलेल्या जंगलाच्या विविध भागांमध्ये फेकला, अशी कबुली आफताबनं पोलिसांना दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलीस जंगलात मृतदेहांच्या तुकड्यांची शोधाशोध करत आहेत.

आफताबनं १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत त्यानं मृतदेहाची विल्हेवाट लावली. या संपूर्ण घटनाक्रमाला जवळपास ५ महिने उलटले आहेत. त्यामुळे आता पोलिसांना केवळ हाडं सापडत आहेत. पोलिसांना जंगलात आतापर्यंत विविध प्रकारची १७ हाडं सापडली आहेत. ही हाडं माणसाचीच असल्याचं फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. मात्र ही हाडं श्रद्धाचीच आहेत हे सिद्ध करणं आव्हानात्मक आहे. त्यामुळे डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.