धक्कादायक ! मुंबईत डेल्टाचा पहिला बळी; राज्यात बुधवारी २० रुग्ण
बातमी महाराष्ट्र

धक्कादायक ! मुंबईत डेल्टाचा पहिला बळी; राज्यात बुधवारी २० रुग्ण

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमधील एका ६३ वर्षीय महिलेचा कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीमधील एका ८० वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे १३ जून रोजी मृत्यू झाला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईमधील या महिलेचा मृत्यू डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याची माहिती ११ ऑगस्ट रोजी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये हा खुलासा झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णामधील जिनोम सिक्वेन्सिंगच्या अभ्यासामध्ये सात जणांना डेल्टा प्लस व्हेरिएटची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापालिकेने डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांचा शोध सुरु केला. याच चाचण्यांदरम्यान या महिलेचीही चाचणी घेण्यात आलेली.

कुटुंबियांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू २७ जुलै रोजी झाला. आता या महिलेच्या संपर्कात आलेल्या दोघांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. ६३ वर्षीय महिला रुग्णाचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे. आम्ही या महिलेच्या जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं आहे. त्यापैकी सहाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या चाचण्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी दोघांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. इतरांच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांने दिली आहे.

बुधवारी राज्यात डेल्टा प्लसचे २० रुग्ण
राज्यामध्ये बुधवारी डेल्टा प्लसचे २० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी मुंबईमध्ये सात तर पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी सहा रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांची संख्या ६५ वर पोहचली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण जळगावमध्ये आढळून आलेत. येथे डेल्टा प्लसचे १३ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल रत्नागिरी (१२), मुंबई (११), ठाणे (६), पुणे (६) तसेच चंद्रपूर, अकोला, सिंधुदूर्ग, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीडमध्येही रुग्ण आढळून आले आहेत. गोंदिया, नांदेड, रायगडमध्ये प्रत्येकी दोन तर पालघरमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत.